पुणे जिल्हा : कांद्याने गाठला उच्चांकी भाव

दहा किलोला 711 रुपये दर
मंचर – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी (दि. 26) उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 25 हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला 711 या उच्चांकी भावाने विकला गेला असल्याची माहिती सभापती वसंतराव भालेराव आणि उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
नवीन कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आलेला नाही. बराखीत साठवून ठेवलेला जुना कांदा विक्रीसाठी येत आहे. हा कांदा खूपच कमी शिल्लक राहिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर मुख्य बाजार आवारात 25 हजार कांदा पिशव्याची आवक झाली. मे. गोपालकृष्ण ट्रेडर्स किरण निघोट व चंद्रकांत थोरात, वसंतराव थोरात यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी निलेश शांताराम टाव्हरे,
निरगुडसर यांच्या कांद्याला दहा किलोस 711 रुपये असा आत्तापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला. बदला कांदासुद्धा 30 रुपये किलो या भावाने विकला जातो आहे. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर भाव स्थिर होतील; मात्र कांद्याचे बाजारभाव पुढील काळात वाढण्याची शक्यता व्यापारी बाळासाहेब बाणखेले यांनी व्यक्त केली. भाववाढीमुळे शेतकरी समाधान व्यक्त करत असले तरी कांदा साठवणुकीचा खर्च, तसेच कांद्याची सड पाहता त्यांना अपेक्षित फायदा मिळणार नाही.
कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
सुपर लॉट 1 नंबर गोळा कांदा 651 ते 711 रुपये, सुपर गोळे कांदे 1 नं. 600 ते 651 रुपये, सुपर कांदे 550 ते 600 रुपये, सुपर मीडियम 2 नं. कांद्यास 400 ते 550 रुपये, गोल्टी कांद्यास 200 ते 400 रुपये, बदला कांद्यास 200 ते 300 रुपये असा बाजारभाव मिळाला.





