पुणे जिल्हा : फुशारकी नव्हे, क्रमांक एकचा तालुका करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन
जळोची – बारामतीत पोलीस उपमुख्यालय, पोलीस वसाहत, बस स्थानक या कामांच्या भूमिपूजनापासून ते आजवर मी किमान 40 वेळा तेथे भेट देवून पाहणी करत काम करून घेतले आहे. अभिमान वाटावा असे ही काम झाले आहे. पोलीस विभागाला 39 वाहनेही आज दिली आहेत. करायचे तर एक नंबर नाही तर आपण त्याच्या नादाला लागत नाही. अजून विकासकामे करायची असून त्यासाठी शिंदे, फडणवीस यांनी साथ द्यावी, सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अनेक मंत्री उपस्थित होते. नमो रोजगार मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर सर्वप्रथम खासदार सुप्रिया सुळे आल्या, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मंचावर आले.
सुळेंनी शिंदे यांचे नमस्कार करून हसत स्वागत केले. त्यांच्या शेजारीच अजित पवार उभे होते. पण सुळेंनी त्यांच्याकडे बघणेही टाळत, शिंदे आणि अजित पवारांच्या मागून त्या पुढे येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यांचे स्वागत केले. यानंतर जवळपास काही क्षण दोघे त्या फडणवीसांशी बोलत होत्या. यावेळी अजित पवार त्यांच्या मागेच होते. पण सुळेंनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. फडणवीसांशी बोलल्यानंतर सुळे अन्य पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुढे जात दादांना नजरांदाज केले.
…अन् अजितदादांचा चेहरा पडला
नमो महारोजगार मेळावा हा निमित्त लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा मनोदय महायुतीचा होता; परंतु हा कार्यक्रम शासकीय असल्याची आठवण खासदार सुळे आणि शरद पवार यांनी करुन दिली. त्यामुळे बारामतीत अजितदादांचा शक्तिप्रदर्शनाचा मनसुबा शरद पवारांनी व्यासपीठावर उपस्थित राहून हाणून पाडला. शरद पवार मंचावर येताच एकच आवाज जल्लोष झाला आणि अजितदादांचा चेहरा पडला असल्याची अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु झाली होती.





