Pune District : नीरा नदी कोरडी ठाक

वडापुरी : मे महिन्यात कोणाच्या झळा वाढल्या असताना नीरा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्या असून जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरेत पाणी सोडून बंधारे भरण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, गिरवी, ओझरे, लुमेवाडी, सराटी, निरनिमगाव तर माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज, आनंदनगर, चाकोरे गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत.
जनावरांच्या चार्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नीरा नदीच्या पाण्यावर इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेकडो एकर शेतीवरील पिके जोपासली जातात. अनेक ठिकाणी पिके जळून चालली आहेत तर अनेक ठिकाणी शेती ओसाड ठेवण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे. वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडून बंधारे भरून घेण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.





