पुणे जिल्हा : अयोध्येप्रमाणे नारायणगाव सजले

घरोघरी भगवे ध्वज, गुढ्या, तोरणे उभारत दिवाळी साजरी होणार
नारायणगाव – अयोध्येबरोबर आता नारायणगावनगरीतही श्री प्रभूरामांच्या प्रतिष्ठापणेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून आयोध्येसारखी नारायणगाव नगरी सजली आहे.
श्रीराम मंदिरात सकाळी सहा वाजता नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या हस्ते सोमवारी (दि.२२) श्री प्रभूरामाला अभिषेक करण्यात येणार असून, त्यानंतर श्रीराम, हनुमान याग होणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता महाआरती, दुपारी चार वाजता प्रभू श्रीरामांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पाच ते सहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.
नारायणगावतील बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, गणपती मंडळांचे कार्यकर्ते श्रीराम कार्य करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. नारायणगावात वाटप केलेल्या अक्षता २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात येऊन प्रभू श्रीरामांना अर्पण करण्यात येणार आहेत.
प्रत्येकाने आपापल्या घरी भगवे ध्वज, गुढ्या तोरणे उभारून, घरे सजवून रांगोळीच्या पायघड्या घालाव्यात. राष्ट्र दैवताची प्राणप्रतिष्ठा थाटामाटात, भक्तीभावात व जल्लोषात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कारसेवकांची मिरवणूक
अयोध्या येथे बाबरी मशीद पाडताना उपस्थित असलेल्या कारसेवक आशिष माळवदकर, सोमनाथ कानडे, नामदेव शिंदे, रामदास भांबेरे, अशोक गराडे, कैलास पोपळघट, राम बर्डे, सुरेश खैरे, तृप्ती भार्गव, कैलास लोहार, माधव बारसोडे, आशा बुचके यांची मिरवणूक काढून सन्मान करण्यात येणार आहे.





