Pune District : नागवेलीच्या विड्याच्या पानाचे दर गडगडले

शेतकरी आर्थिक विंवचनेत : महादेव जानकरांनी दिली भेट
निमगाव केतकी : नागवेलीच्या विड्याच्या पानाचे दर सध्या गडगडले असून सहा हजार पानांना केवळ 250 रुपये येत असल्याने पान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत.
नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी रविवारी (दि. 13) पान बाजाराला भेट देऊन पानमळेधारक, व्यापारी, शेतकर्यांशी संवाद साधला. त्यावेळी पडलेल्या दरावर मार्ग काढावा अशी मागणी जानकर यांच्याकडे शेतकर्यांनी केली. यावेळी गोरख आदलिंग, ब्रह्मदेव शेंडे, कांतीलाल राऊत, अॅड सचिन राऊत, संतोष हेगडे, अण्णा पाटील, विराज पाटील ,विशाल जगताप, राहुल बरळ, गणेश पवार, बापू खराडे यांच्यासह आदी शेतकरी, मळेधारक,व्यापारी उपस्थित होते.
पान उत्पादक मळेकरी व विक्रेते ब्रह्मदेव शेंडे, गोरख आदलिंग यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालले आहे. पिकवतो त्याला दाम मिळत नाही. गुटखा, मावा, मसाला आदी चैनीच्या वस्तू बाजारात सर्रास विकल्या जातात.
यावर शासनाचे निर्बंध आणखी कडक केले पाहिजेत. मात्र आयुर्वेदात उल्लेख असलेले शरीरास पचन क्रियेसाठी रक्त शुद्धी व वाढीसाठी बहुउपयोगी असलेले पान टपरीवर महाग विकत असले तरी प्रत्यक्षात पिकवणार्याला अत्यंत कमी पैसे मिळत आहेत. तसेच पानमळ्यामध्यातून ग्राहकाच्या हातात येई पर्यंतच्या प्रवासात पान उत्पादकांना मोठा खर्च सोसावा लागतो. सध्या फापडा सेज (कळी) गबाळ या पानांचे दर गडगडले आहेत, असे नमूद केले.
कृषीमंत्र्यांकडून आश्वासन
महादेव जानकर यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनीवरून संवाद साधत शेतकर्यांची कैफियत सांगून खाण्याच्या पानाला दर्जा मिळावा तसेच तो पिकवणार्या मळेधारकांना चार पैसे राहावे. अशा पद्धतीने ठोस उपाययोजना शासन स्तरावर करावी अशी मागणी केली. यावर मंत्री कोकाटे यांनी देखील लवकरच यात मार्ग काढणार असल्याचे आश्वसित केले.





