Pune District : मंचर शहरात मच्छरांमुळे आजारांचा प्रादुर्भाव

– नगरपंचायत, आरोग्य विभागाने उपाय योजना करण्याची गरज
मंचर – मंचर शहर आणि परिसरात बखळ जागेत मोठ्या प्रमाणात पावसामुळे गवत वाढले आहे. तसेच काही डबक्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी मंचर नगरपंचायतने खबरदारी घेऊन तातडीने उपाययोजना केल्यास भविष्यात येणारे साथीचे रोग टळण्यासाठी मदत होईल.अशी मागणी मंचर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी केली आहे
मंचर हे आंबेगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे. खोकला, ताप, सर्दी, जुलाब, उलट्या, अशक्तपणा यामुळे काही जण त्रस्त आहेत. मुख्यत्वे करून डासांपासून होणाऱ्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले असून मंचर शहरात ठिकठिकाणी असलेले कचऱ्यामुळे डासाची उत्पत्ती होत आहे. कचऱ्याच्या ढिगाबरोबरच ठिकाणी पावसामुळे पाण्याची डबकी साचली असून काही सोसायटीचे सांडपाणी, ड्रेनेज, गटारे उघडी असल्याने या ठिकाणी डासाची उत्पत्ती होत आहे.
नगरपंचायत प्रशासनाने पहाटेच्या सुमारास कचरा उचलून न्यावा,कचरा उचलून नेलेल्या ठिकाणी निर्जंतुक फवारणी करावी, तसेच शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवले आहे.तसेच गटारे, पाईपलाईन उघडी असेल तेथे त्या धुरळणी करावी.म्हणजे भविष्यात साथीचे आजार होणार नाही.याची दक्षता घ्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
कचऱ्याचे ढीग
मंचर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असून नगरपंचायतच्या माध्यमातून हा कचरा वेळेत उचलला जात नाहीत. ढीग उचलण्यासाठी नगरपंचायतीची गाडी काही ठिकाणी दुपारी येते. त्यामुळे कचरा उचलण्यास उशीर होतो व त्यातूनच डासांची उत्पत्ती होऊन आजार वाढण्यासाठी मदत होते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मंचर नगरपंचायतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच नागरिकांनी कचराकुंडीत किंवा कचरा नेण्यासाठी वाहने आल्यानंतरच त्यामध्ये कचरा टाकावा. कोणीही कचरा उघड्यावर टाकू नये. अन्यथा मंचर नगरपंचायतीच्या वतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सद्यस्थितीत शहरात कोणतीही आजाराची साथ नाही. मंचरकरांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मंचर नगरपंचायत नेहमीच दक्ष आहे.
– राजश्री मोरे,आरोग्य विभाग प्रमुख मंचर नगरपंचायत.





