मातोश्री येथे धैर्यशील मोहिते पाटलांचा सत्कार अकलूज – माढा लोकसभेतच नव्हे तर राज्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने उत्साह संचारला. मोहिते पाटील यांचे बंड महाविकास आघाडीला ऊर्जा देवुन गेले आणि याच ऊर्जेच्या बळावर राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबई येथे गुरूवारी (दि. 14) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री येथील निवासस्थानी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट दिली . त्यावेळी त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होती. यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे, युवा जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, तालुका प्रमुख संतोष राऊत, अरविंद पाटील, बंडू घोडके, शहरप्रमुख कमुद्दिन खतीब, तुषार इंगळे, महादेव बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले , माढा लोकसभा निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती . महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम केले म्हणूनच मोठे मताधिक्य मिळाले. माझी खासदारकी ही माढा लोकसभेतील प्रत्येक मतदारांच्या अपेक्षापूर्तीसाठी असेल. या मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, उद्योग व मूलभूत शिक्षण यासाठी समर्पित असेल, असे त्यांनी नमूद केले. मुंबई : मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.