Pune District : आधुनिक शिरूर मॉडेल करणार

शिरूर : शिरूर शहराच्या ऐतिहासिक वैभवाला आधुनिकतेची जोड देत आमदार कटके यांनी संकल्पनेतील शिरूर महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे. उपक्रमातून शिरूर शहराचा सर्वांगीण विकास साधत सर्व घटकांसाठी एक सुरक्षित, सुसज्ज, सुसंस्कृत आणि आधुनिक सुविधा असलेले मॉडेल शिरूर उभे करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती शिरुर- हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
आमदार कटके यांच्या प्रयत्नांतून शिरूर एस. टी. डेपोमध्ये नव्याने पाच एसटी बसेस दाखल झाल्या. बससेवेचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकासकामांचा आढावा दौरा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार कटके यांनी अनेक महिन्यांपासून सुविधेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित निर्णय घेतला. आमदार कटके म्हणाले, शासनाच्या सहकार्याने शिरूरसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहराला ही सेवा मिळणे गरजेचे होते. ही सेवा म्हणजे केवळ वाहतूक नाही, तर ग्रामीण जनतेसाठी नवा दुवा आहे.
नियोजित दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा आढावा आमदार कटके यांनी शिरूर शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन विकासकामांची प्रगती, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या भूमिकेचा आढावा घेतला.
नगरपरिषद आढावा बैठक नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नळपाणी योजना, रस्त्यांचे डागडुजी कामे, सांडपाणी निचरा आदी बाबींवर चर्चा झाली. अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
मॉडेल शिरूरसाठी काम सुरू
कटके म्हणाले की, आमदार माऊली कटके यांच्या पुढाकारातून शिरूर शहरासाठी एक “संकल्पनेतील शिरूर” मॉडेल शहर घडवण्याचा संकल्प केला आहे. शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन करत आधुनिक नागरी सुविधांनी समृद्ध अशा शिरूरच्या नव्या रूपाची उभारणी करण्यासाठी आमदार कटके, शिरूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपक्रमाची खरी ताकद असेल. नागरिकांच्या सहभागातून, सर्वेक्षणाच्या माध्यमातून एक मॉडेल शिरूर उभारण्याचे काम आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे.
चार टप्प्यांतून प्रकल्पाची उभारणी
कटके म्हणाले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्र, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा टेली-मेडिसिन, आपत्कालीन कक्ष, मातृत्व सेवा यावर भर, स्मार्ट शिक्षण सुविधा आणि शाळा, डिजिटल क्लास रूम्स, अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्रे, गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना, हायटेक बस स्थानक, पर्यावरणपूरक बसेस, महिलांसाठी स्वतंत्र बस सुविधा, रस्ते व वीज व्यवस्था, शिरूरचा इतिहास जपणारे संग्रहालय (म्युझियम) आदींचा समावेश आहे. सर्वेक्षण – संवाद- संकल्पना- अंमलबजावणी” या चार टप्प्यांतून हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
३०० कोटींचा निधी आवश्यक
सर्व संकल्पनांचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकल्पांत करण्यासाठी आमदार कटके यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शासनाकडे जमा असलेली शहरातील १७ एकर जागा पुन्हा शिरूर नगरपरिषदेच्या ताब्यात मिळवण्यास ते यशस्वी ठरले. या उपक्रमासाठी ३०० कोटी निधी लागणार आहे. यापैकी आमदार कटके यांनी शासनाकडून ३६ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून घेतला आहे, तो प्रत्यक्ष कामांमध्ये वापरला जाणार आहे.





