Pune District: सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी आमदार कुल

पारगाव : महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच विधानभवन, मुंबई येथे या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अॅड. राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यामुळे या समितीच्या अध्यक्ष पदावर आमदार राहूल कुल यांची निवड ही दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
आमदार अॅड. कुल यांचे वडील दिवंगत आमदार स्व. सुभाष अण्णा कुल यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याच पद्धतीने आमदार अॅड. कुल यांना मागील कालावधीत पहिल्यांदा विधानसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. पुन्हा दुसर्यांदा महाराष्ट्र विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे.
राज्यातील सार्वजनिक उपक्रमांचे कार्य अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि जनहित केंद्रित राहील, यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्व सदस्यांच्या सहकार्याने कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक व निष्कलंक पद्धतीने समितीचे कार्य चालवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सार्वजनिक उपक्रम समिती ही एक अत्यंत महत्त्वाची समिती असून राज्यातील विविध सरकारी कंपन्या, महामंडळे, आणि इतर सार्वजनिक संस्था यांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवण्याचे काम ही समिती करते.
यावेळी राज्याचे महालेखाकार (वाणिज्यिक) दत्तप्रसाद शिरसाट, आमदार मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, निलेश राणे, निरंजन डावखरे, धर्मराव बाबा अत्राम, अभिजित वंजारी, विलास भुमरे, सुलभा खोडके, विधीमंडळ सचिवालय समितीचे अवर सचिव आशिष जावळे व इतर अधिकारी उपस्थित होते.





