Pune District : वीज ग्राहकांना बसविण्यात येणारे मीटर हे फक्त टीओडीच

बारामती : महावितरणमार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी (टाईम ऑफ डे) मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाईम) उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर व पर्यायाने वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे. तसेच अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. टीओडी मीटर हे पोस्ट पेड असून मीटर रीडिंगनुसारच त्याचे बिल देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांवर कोणताही खर्चाचा भार न टाकता बसवण्यात येणारे टीओडी मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचेच असून ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
बारामती परिमंडलात सध्या नवीन वीज जोडणी करता देखील टीओडी मीटर वापरण्यात येत आहेत. टीओडी मीटर बसवण्याच्या करारानुसार ठेकेदाराने मीटर बसवून या मीटरची देखभाल दहा वर्षे करायची आहे. मात्र, काही भागात गैर समजातून ग्राहक उपयोगी टीओडी मीटरला विरोध करत आहेत. हा विरोध निराधार असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
खर्चाचा भार ग्राहकांवर नाही
अद्ययावत मीटर बसविल्याने महावितरणची वाणिज्यीक हानी कमी होणार आहे. तसेच वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या महसूल वाढीतूनच टीओडी मीटरचा खर्च भागविण्यात येणार आहे.
टीओडी मीटरद्वारे ग्राहकांचे बिलावर नियंत्रण
टीओडी मीटरमधून वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटची रिअल टाईम माहिती ही ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येत नसेल तर ग्राहकास हे कळणार आहे. बसवण्यात येणारे टीओडी मीटर हे राष्ट्रीय मानांकनप्राप्त लॅबमधून चाचणी केलेले असल्याने ग्राहकांना वापरा इतकेच वीज बिल मिळणार आहे. अत्यंत नावीन्यपूर्ण अशी पारदर्शी सुविधा वीज ग्राहकांना नव्या टीओडी मीटरमुळे मिळणार आहे.
मीटरमध्ये ‘टीओडी’ सुविधा गरजेची
राज्यात सुरू असणाऱ्या रुफ टॉप सोलर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांमुळे दिवसा स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. भविष्यात दिवसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारी वीज वापरली जावी यासाठी औद्योगिक ग्राहकांच्या धर्तीवर घरगुती ग्राहकांनाही दुपारच्या वेळी वीज दरात सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. सध्या बसवण्यात येणाऱ्या मीटरमध्ये टीओडी (टाईम ऑफ डे) ही सुविधा उपलब्ध असून ग्राहकांना स्वस्त वीज दराचा फायदा होणार आहे. जून्या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा नसल्याने ग्राहकांना दिवसा स्वस्त वीज दराचा फायदा मिळू शकणार नाही.





