पुणे जिल्हा : शंभर एकरांवर होणार जरांगे-पाटलांची सभा ; खेड घाटाजवळ जागा निश्चित

पाच लाख मराठा बांधव उपस्थित राहण्याचा अंदाज
राजगुरूनगर – मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची येत्या शुक्रवारी (दि. 20) राजगुरूनगर येथे होणाऱ्या जाहीर सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
या सभेला जिल्ह्यातील तीन ते पाच लाख मराठा बांधव राहणार आहेत, असा अंदाज खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाने वर्तवला आहे. त्यासाठी 100 एकर जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गा लगत खेड बाह्यवळण घाटाजवळ तुकाई वाडी हद्दीतील 100 एकर जागेवर ही सभा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व खेड पोलिसांसह मंगळवारी (दि. 17) या जागेची पाहणी केली.
सत्तेत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात होत असलेल्या या भव्य सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान सभेसाठीच्या जागेची स्वच्छता सपाटीकरण करण्यास सुरुवात झाली आहे.





