Pune District : विजेच्या गंभीर समस्यांवर उपाययोजना करणार

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींना महावितरणचे आश्वासन
चाकण – चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून वारंवार होणारे पावर फेल्युअर, फ्लक्च्युएशन आणि एक्सप्रेस फिडरवर होणारे डीप यामुळे स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे नुकसान सहन करावे लागत आहे. मशीनच्या मेंटेनन्स खर्चात वाढ, उत्पादनातील घट, रॉ मटेरियलची नासाडी अशा अनेक समस्यांमुळे उद्योगांचे आर्थिक नुकसान होत असून याचा थेट परिणाम एमएसईडीसीएलच्या महसुलावरही होत आहे.
या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी यांनी नुकतीच महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची प्रकाशभवन, सेनापती बापट रोड, पुणे येथे भेट घेतली. यावेळी एमएसईडीसीएलचे प्रकल्प संचालक तालेवार आणि मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते. फेडरेशनच्या प्रतिनिधींनी चाकण परिसरातील विजेच्या सद्यस्थितीबाबत सांगितले की एमएसईडीसीएलची यंत्रणा ओव्हरलोड झाली आहे,
पावर शॉर्टेज वाढला आहे आणि यामुळे उद्योगांचे नुकसान होत आहे. त्यांनी हेही निदर्शनास आणून दिले की उद्योगांकडून महावितरणसाठी स्वखर्चाने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागा आणि निधी दिला जातो, तरीसुद्धा उद्योगांची पिळवणूक थांबत नाही. या बैठकीनंतर चाकण औद्योगिक परिसरातील उद्योगांना विजेच्या प्रश्नांपासून लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लोकेश चंद्रा यांनी फेडरेशनला दिलेले आश्वासन
* पुढील वर्षभरात चाकण परिसरातील एमएसईडीसीएलची यंत्रणा सक्षम करण्यात येईल.
* उद्योगांना क्वालिटी आणि अनइंटरप्टेड पावर पुरवण्यात येईल.
* पावर शॉर्टेज पूर्णपणे थांबवण्यात येईल.
* पुढील पाच वर्षे इलेक्ट्रिसिटी टेरिफ वाढवले जाणार नाही.
* उद्योगांना वीज संदर्भात तक्रार करण्याची वेळ येऊ दिली जाणार नाही.





