Pune District : सासवडनगरीत माउलींचा सोहळा विसावला

हजारो भाविकांनी अनुभवला नयनरम्य सोहळा
सासवड – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी वारी पालखी सोहळा रात्री ९:३० वाजता टाळ, मृदंगाच्या गजरात आणि माऊली माऊलीच्या जयघोषात सासवड नगरीत दाखल झाला. हजारो भाविकांनी “याचि देही याचि डोळा” असा हा नयनरम्य सोहळा अनुभवला. पालखी सोहळा सासवड नगरीमध्ये विसावला.
पालखीच्या आगमनावेळी सासवड शहरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी होत्या. पालखीचे स्वागत करण्यासाठी सासवड शहरात दोन्ही बाजूंनी भाविकांची अलोट गर्दी जमली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषांनी शहर भक्तिमय झाले होते. पालखी रथावर सासवड नगरपरिषदेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. माउलींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखीचे आगमन झाल्यानंतर चंदनटेकडी येथे नगरपरिषदेच्या वतीने तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका व नगरपालिका विभाग प्रमुखांनी सर्व दिंडीप्रमुख, विणेकरी, चोपदार यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. रात्री ९:३० वाजता समाजआरती होऊन पालखी सोहळा सासवड नगरीत विसावला.
भाविकांनी उशिरापर्यंत माउलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण सासवड शहर भक्तिरसात न्हालं होते. (दि.२२) व (दि.२३) रोजी माउलींची पालखी सासवडमध्ये दोन दिवस मुक्कामासाठी असणार आहे.





