Pune District : घर, गाडीचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने विवाहितेचा छळ

थेऊर : घराचा व गाडीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून 55 हजार न आणल्याने विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ कडून मारहाण केल्याची घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत फेब्रुवारी 2025 ते 4 जून 2025 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी 19 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुशिल सिध्दराम बिल्लाळे, सासू मिना सिध्दराम बिल्लाळे, सासरा सिध्दराम गणपतराव बिल्लाळे व दीर स्वप्नील सिध्दराम बिल्लाळे (सर्व रा. गणेशवाडी थेऊर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि सुशिल बिल्लाळे यांचा प्रेमविवाह झाला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये फिर्यादी यांचे सासरे सिध्दराम बिल्लाळे यांनी माहेरकडून घराचा व वेस्पा मोटार सायकलचा हप्ता भरण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यावेळी फिर्यादी यांनी वडिलांकडून पैसे आणून दिले होते. त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा हप्ता भरण्यासाठी पैशाची मागणी केली होती. त्यावेळी देखील फिर्यादी यांनी माहेरहून पैसे आणून दिले होते. त्यानंतर सासरच्या मंडळींची पैशाची मागणी वाढतच गेली. सिध्दराम किल्लाळे यांनी यावेळी 55 हजार रुपयांची मागणी केली होती, त्यावेळी विवाहितेने त्या मागणीस नकार दिला.
तेव्हा फिर्यादी यांची सासू मिना बिल्लाळे म्हणाल्या, तु लग्नामध्ये काय घेवून आली नाही, तसेच लग्नात आमचा मान-पान देखील केला नाही, असे बोलून शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी यांनी प्रतिउत्तर दिले असता, सुशिल याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. व बेडरुममध्ये कोंडून ठेवले होते. तर दीर स्वप्नील याने फिर्यादी यांना दमदाटी केली. दरम्यान, आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांना माहेरहून पैसे आणण्याकरिता शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला आहे.
या वारंवार त्रासाला कंटाळून विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार चारही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





