Pune District : माहेराहून पैशांच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

वाघोली : वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच माहेरहून पैसे तसेच हुंड्यात सोन्याचे दागिने आणावे म्हणून सासरकडील नातेवाईकांनी विवाहितेचा छळ केल्याने छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना केसनंद तळेरानवाडी रोड येथे घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सासू, दीर, तसेच मामे सासर्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती सूरज पाठक (वय 20) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सूरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय 26, रा. ओम निवास, तळेरानवाडी रस्ता, केसनंद, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सासू सुनीता पाठक (वय 45), दीर नीरज पाठक (वय 23), मामे सासरे अरुण उपाध्याय, अरविंद उपाध्याय (सर्व रा. केसनंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वातीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वाती मूळची मध्य प्रदेशातील आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सूरज पाठक याच्याशी तिचा विवाह झाला होता. स्वातीच्या कुटुंबीयांनी लग्नात एक लाख रुपये हुंडा आणि सात तोळे सोन्याचे दागिने दिले होते. मात्र विवाहानंतर काही महिन्यातच पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला.
तिला टोमणे मारण्यात आले. आरोपीतांनी माहेरहून पाच लाख रुपये हुंडा आणि सोन्याचे दागिने घेऊन येण्याची मागणी केली. छळामुळे स्वातीने राहत्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हुंड्यासाठी मुलीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद स्वातीच्या आईने दिली.





