पुणे जिल्हा : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गावातच थोपटे पिछाडीवर

मुळशी तालुक्यातील स्थिती : 228पैकी 223 मतदान केंद्रात मांडेकरांची जोरदार मुसंडी
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांच्या गावातच संग्राम थोपटे हे पिछाडीवर राहिले. आमदार शंकर मांडेकर यांनी मुळशी तालुक्यातील 228 मतदान केंद्रांपैकी 223 केंद्रात मताधिक्य घेत जोरदार मुसंडी मारली. महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गावातच मांडेकर यांनी मोठी आघाडी घेत विजयश्री खेचून आणला.
भोर विधानसभा मतदारसंघात मुळशी तालुक्यातील 2 लाख 6015 मतदार होते. त्यापैकी एक लाख 26 हजार 607 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शंकर मांडेकर यांना 81,749 तर संग्राम थोपटे यांना केवळ 28 हजार 375 मते मते मिळाली. अपक्ष उमेदवार किरण दगडे यांना एक 13,132 व कुलदीप कोंडे यांना केवळ 1044 मते मिळाली. 1486 जणांनी नोटाला पसंती दिली. 228 मतदान केंद्रांपैकी बारपे बुद्रुक, भांबर्डे, वळणे, कोंढुर आणि साईव खुर्द या पाच केंद्रांमध्येच संग्राम थोपटे यांना आघाडी मिळाली. बाकी 223 केंद्रात शंकर मांडेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच जोरदार आघाडी घेतली होती.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या कोंढुर गावात संग्राम थोपटे यांना 14 मतांची आघाडी मिळाली. इतर नेत्यांच्या गावात मात्र थोपटे यांना आघाडी घेण्यात सपशेल अपयश आले. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांच्या गावात मांडेकर हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.
मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोर विधानसभा प्रमुख प्रकाश भेगडे यांच्या घोटावडे गावात आमदार मांडेकर यांना एकूण सहा मतदान केंद्रातून 1367 मतांच्या आघाडी मिळाली. तर बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे यांच्या मारुंजी गावातील सहा केंद्रात मांडेकर यांना 974चे मताधिक्य मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या हाडशी मध्ये थोपटे हे 287 मतांनी पिछाडीवर राहिले.
थोपटे यांच्या प्रचारात सक्रीय असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे यांच्या बावधनमध्ये, काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्ष निकिता सणस यांच्या भूगावमध्ये, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख स्वाती ढमाले यांचे अंबडवेट गावात, जिल्हाप्रमुख संगीता पवळे यांच्या पिरंगुट गावात, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख अविनाश बलकवडे यांच्या दारवली गावात, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ यांच्या म्हाळुंगे गावात, बाजार समितीचे संचालक राम गायकवाड व ज्येष्ठ नेते नानासाहे शिंदे यांच्या शिंदेवाडी – कासार आंबोली या गावात तसेच अनेक प्रमुख नेत्यांच्या गावातच थोपटे हे पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.
हा विजय माझा नसून भोर – राजगड आणि मुळशी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचा आहे. तीनही तालुक्याच्या अधिक विकास करायचा आहे. विशेषतः युवा वर्गाने घेतलेली प्रचंड मेहनत यावर हा विजय मिळाला आहे. मुळशीकरांनी ठरवले होते की आमदार मुळशीचाच करायचा. मुळशीकरांनी हे सार्थ करून दाखविले. त्याला भोर आणि राजगड मधील मतदार राजांनी चांगली साथ दिली.
-शंकर मांडेकर, नवनिर्वाचित आमदार





