बेशिस्त पार्किंगवर जेजुरी पोलिसांची कारवाई : अतिक्रमणेही हटवली नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा येथे प्रमुख पेठेत बेशिस्त पार्किंग आणि फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर जेजुरी पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात आली. तर पुढील काही दिवस बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमणाची पोलिसांनी हटवली असून नीरेतील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे त्यांच्या इतर सहकर्यांसोबत सोमवारी (दि. 23) सकाळी नीरा येथे दाखल झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी चौक ते बुवासाहेब दरम्यान करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. त्याचबरोबर बेसिस्त पार्किंग करणार्या वाहनचालकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर विनापरवाना वाहन चालक, बेशिस्तपणे वाहन चालवणारे वाहन चालक, अल्पवयीन वाहनचालक यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. पोलिसांबरोबर नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले हे देखील या कारवाईच्या वेळी उपस्थित होते. रस्त्यावर होणारे अतिक्रमण काढण्याची मागणी नीरा येथील सामान्य नागरिक करीत होते. अशा लोकांना ग्रामपंचायतीने नोटीसा देखील बजावल्या होत्या; मात्र हे लोक कोणताही प्रतिसाद देत नसल्याने अखेर सोमवारपासून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.येथून पुढे देखील दोन पोलीस कर्मचारी हे दररोज अशा प्रकारची कारवाई करतील. – दीपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी