Pune District : शंभर टक्के करवसुलीसाठी पेठमध्ये लकी ड्राॅ योजना

पेठ : सातगाव पठार (ता.आंबेगाव) भागातील पेठ ग्रामपंचायत ही संपूर्ण सातही गावांमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील नागरिकांनी १०० टक्के कर भरावा, यासाठी पेठ ग्रामपंचायतीने कर भरा आणि विविध बक्षिसे जिंका, त्याचबरोबर कोकण ट्रिपचाही आनंद घ्या, अशी भन्नाट योजना सुरू केली आहे.
१०० टक्के करवसुलीसाठी सरपंच आणि सर्व सदस्यांनी ही शक्कल लढवली असून भव्य लकी ड्रॉ सोडतीच्या माध्यमातून विजेत्यांची नावे घोषित होणार आहेत. आता या योजनेतून करदात्याला फ्रिज, पीठगिरणी, एलईडी टीव्ही, मिक्सर, सोन्याची नथ, कुकर, फॅन, पैठणी, डिनर सेट व ग्लास सेट, अशा ३५ विविध बक्षिसांची रेलचेल या योजनेत आहे. तसेच ज्या करदात्यांना बक्षिसे मिळालेली नाहीत त्यांना शेतकरी सहल कोकण ट्रिपचा आनंद घेता येणार आहे. तसेच सर्व खातेदारांना चारशे रुपये किमतीचे दोन डस्टबिन ग्रामनिधीअंतर्गत मोफत दिले जाणार आहे.
करबुडव्यांमुळे दरवर्षी थकीत प्रमाण वाढत असते. खरंतर या कराच्या माध्यमातून गावांचा विकास अवलंबून असतो. पण, १०० टक्के कर वसुली होत नसल्याने त्याचा विकासावर परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा कर वसुलीसाठी व्याज, दंड माफ अशा सवलतीच्या योजना सुरू केल्या जातात. पण, त्याचा फारसा फायदा होत नाही. मात्र, पेठ या ग्रामपंचायतीने यंदाच्या वर्षी १०० टक्के कर वसुलीसाठी बक्षीस योजना ही अफलातून आणि हटके योजना जाहीर केली आहे.
पेठ हे मोठे गाव असून त्याची लोकसंख्या ५७९५ एवढी आहेपैकी गावातील एकूण करपात्र खातेधारक २०८० आहे. पण, अनेकजण थकबाकी भरत नाही. जे कर भरत नाहीत, त्यांचे नळ कनेक्शन तोडणे, गाळे सील करणे, असे अनेक उपाय ग्रामपंचायत करू शकते पण त्यामधून कटुता निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे चालू वर्षी ग्रामपंचायतीने बक्षीस योजना राबवलेली आहे. ३१ मार्चपर्यंत कर भरण्याचा दिनांक असून १६ मेला भव्य लकी ड्रॉ सोडत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून थकीत ३३,१४,८४९ रुपये आणि चालू ३५,९३,९०० रुपये असून ग्रामपंचायत कराचा एकूण आकडा ६९,०८,७४९ लाखांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्याचा विकास कामावर मोठा परिणाम होत आहे. गावातील करदात्यांना वेळोवेळी सूचना देऊन प्रसंगी दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन सुद्धा अपेक्षित वसुली होत नाही. शिवाय यामध्ये अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊन वेळप्रसंगी वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होण्याचा धोका असतो. असे प्रसंग निर्माण होऊ नये म्हणून ही योजना राबवली आहे. तसेच ७० टक्क्यांपेक्षा कर अधिक वसुली झाल्यास बंपर लकी ड्रॉमध्ये मोटरसायकलची सुद्धा सोडत होईल.
– संजय पवळे, सरपंच, पेठ ग्रामपंचायत





