Pune District: स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीमालाचे पदार्थ बनवावेत

मंचर : स्थानिक शेतकरी उत्पादक गटांनी शेतीमालाचे विविध पदार्थ उत्पादित करून विक्री करावी.त्या माध्यमातून स्थानिक शेतकरी उत्पादक गटांना नव्या संधी आणि तंत्रज्ञानाची ओळख मिळण्यास मदत होईल, असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतकरी शिष्टमंडळानी ग्लोबल फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथे भेट दिली. भेटीदरम्यान शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी कृषी व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान, विपणन व्यवस्था आणि शाश्वत शेतीविषयी सखोल चर्चा केली. तळा तालुक्यातील तळा निसर्ग शेतकरी उत्पादक कंपनी – तळा,तळगड निसर्ग शेतकरी उत्पादक कंपनी – तळा, तळा किसान नावकृषक शेतकरी उत्पादक कंपनी – तळा येथील शिष्टमंडळाने चांडोली खुर्द येथील ग्लोबल फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड भेट दिली.
ग्लोबल फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे संचालक राहुल घोडेकर आणि अभिमन्यू इंदोरे यांनी आपल्या कंपनीच्या कार्यपद्धती, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. तसेच, जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी अतुल बाबर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन लोखंडे, आंबेगाव कृषी विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे यांनी या भेटीदरम्यान शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन केले.
शेतीमाल अनेक ठिकाणी उत्पादित होतो. परंतु त्यापासून विविध पदार्थांची उत्पादित क्षमता असतानाही शेतकरी कंपन्या किंवा शेतकरी विक्री व्यवस्थापन करण्यासाठी तयार होत नाही. शेतकऱ्यांनी शेतीमालाचे उत्पादन घेऊन त्यापासून विविध पदार्थ तयार करावे. त्याला बाजारपेठ चांगली आहे.त्याचा फायदा शेतकरी उत्पादक कंपन्यानी घेतला पाहिजे.
-सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव.





