Pune Distric : ऐन उन्हाळ्यात वाघोली परिसरात लोडशेडींगचे संकट

वाघोली : पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी विभागात महावितरणच्या वाघोली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक वीज बिल थकीत ग्राहकांची संख्या मोठी असून घरगुती ग्राहकांची एकूण सुमारे 3 कोटी रुपयांची वीज बिले थकीत असून या थकीत वीज बिलांमुळे ऐन उन्हाळ्यात वाघोली व परिसरातील गावांमध्ये लोडशेडिंगचे संकट उभे राहणार असल्यामुळे मार्च महिन्यापूर्वी थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन वाघोली शाखेकडून करण्यात आले आहे.
मुळशी विभागामध्ये असलेल्या 23 शाखा कार्यालयांमध्ये 3 लाख 94 हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये एकट्या वाघोली शाखा कार्यालयात 1 लाख 4 हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये 83 हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. या घरगुती ग्राहकांकडे जवळपास 3 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणकडून थकीत वीज बिले वसुली केली जात आहे.
लोकसंख्येच्या मनाने वाघोली महावितरण शाखा कार्यालायामध्ये अपुरी कर्मचार्यांची संख्या असतानाच या कर्मचार्यांना आवश्यक कामे करण्याबरोबरच थकीत वीज बिले गोळा करण्यासाठी भटकावे लागत आहे. घरगुती वीज बिले भरण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने थकबाकी असणार्या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे.
थकीत बिले असणार्या ग्राहकांवर वीज पुरवठा खंडित करण्याची महावितरणची कारवाई सुरु असतानाच या थकबाकीमुळे लोडशेडींगची टांगती तलवार ऐन उन्हाळ्यात वाघोली व परिसरातील गावांवर असणार आहे.





