पुणे जिल्हा: डींग्रजवाडी परिसरात बिबट्यांचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोरेगाव भिमा : शिरूर तालुक्यातील डींग्रजवाडी मध्ये कोरेगाव भिमा धानोरे रस्त्यावरील चेअरमन वस्तीवर वर्दळीच्या ठिकाणी दोन बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डींग्रजवाडी येथे मागील काही दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. काही दुर्घटना घडू नये यासाठी या भागात पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यातील डींग्रजवाडी हा भाग कृषीप्रधान भाग आहे. त्यामुळे जवळपास सगळीच माणसे शेतात कामावर असतात. परंतु मागील अनेक दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याने घबराट पसरली आहे.
डींग्रजवाडी गावापासून धानोरे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्स्त्याच्या परिसरात असणाऱ्या चेअरमन वस्ती गणेश नगर ओढ्यालगत सर्वप्रथम हा बिबट्या दिसल्याचे शुभम गव्हाणे यांनी सांगितले. त्यानंतर अनेकांनी बिबट्या दिसल्याचे सांगितले.
आजवर भिमा नदीच्या पलीकडच्या भागात बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते, परंतु आता नदीच्या अलीकडे एमआयडीसीच्या दारात बिबट्याचा प्रवेश झाल्याने स्थानिक नागरिकांसह कामगार व ऊसतोड मजूर वर्गात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबतची माहिती तात्काळ वन विभागाला कळविले असून लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी माजी सरपंच राहुल नरहरी गव्हाणे यांनी केली आहे.





