पुणे जिल्हा : मांडकी परिसरात बिबट्याची दहशत

वाल्हे – मांडकी (ता. पुरंदर) परिसरात बिबट्याची दहशत मागील काही दिवसांपासून वाढत असून महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना घडली आहे.
मांडकी येथील पानशेत येथील धनाजी रामदास शेटे या शेतकर्यांच्या घराशेजारील गोठ्यातील गायीच्या वासरावर बिबट्याने शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री दीडच्या वाजण्याच्या सुमारास हल्ला चढविला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू जखमी झाले. दरम्यान, धनाजी शेटे यांच्या जागृतीमुळे वासरू वाचले.
बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळेल या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पोपट कोळी यांनी घटनास्थळी शुक्रवारी सकाळी भेट देऊन पंचनामा केला आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल जगताप, संचालक केशव शिंदे, सचिन गायकवाड, शिवाजी मोरे, दत्ता शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.





