पुणे जिल्हा : विधानसभा झाली आता मिनी विधानसभेची तयारी

इंदापूर तालुक्यात पवार गटाला आव्हानात्मक असणार
विजय शिंदे
वडापुरी – विधानसभेचा आखाडा पार पडला असून विजयाचा गुलालही उडाला आहे. त्यामुळे आता अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाकडे आता सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. विधानसभेचा एकंदरीत निकाल पाहता इंदापुरातील सात जिल्हा परिषद गटांपैकी सहा गटांवर राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी आव्हानात्मक असणार आहेत.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 240 जागा जिंकत वर्चस्व मिळविले. इंदापूर विधानसभेसाठी झालेल्या लढतीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचा 19 हजार मतांनी पराभव केला, अपक्ष उमेवार प्रवीण माने यांनीही 38 हजाराच्या दरम्यान लक्षवेधी मते घेतली आहेत. आमदार दत्तात्रय भरणे हे बावडा लाखेवाडी गट वगळता इतर सर्व गटात (6) आघाडीवर आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना घरचा बावडा-लाखेवाडी गट वगळता इतरही ठिकाणी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
गेली 20 वर्षांपासून इंदापूर पंचायत समितीची सत्ता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे, तर जिल्हा परिषदेची सत्ता ही राष्ट्रवादीकडे आहे. गेली दोन-तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक कामकाज पाहत आहेत, इंदापूर विधानसभेच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्ता राखण्यासाठी पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांना सणसर-लासुर्णे गट (104), भिगवण- शेटफळगडे गट (4563), पळसदेव-बिजवडी (2962), निमगाव केतकी-निमसाखर (4533) काटी- वडापुरी, (277) कळस-वालचंदनगर (9523) या गटातून मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे.
हर्षवर्धन पाटलांचीही कसोटी
हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी आगामी काळात पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी बावडा-लाखेवाडी, सणसर- लासुर्णे, काटी-वडापुरी हे गट अधिक लक्ष करावे लागणार आहेत तर उर्वरित गटात भिगवण पंचायत समिती गण, पळसदेव पंचायत समिती गण,निमसाखर पंचायत समिती गणात योग्य नियोजन करून कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागणार आहे.
तालुक्याचे राजकारण भरणे-पाटील यांच्या भोवतीच
इंदापूर तालुक्याचे राजकारण आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती नेहमीच फिरत असते. तालुक्यामध्ये आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे हे आहेत तर तालुक्यातील महत्त्वाच्या संस्था हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या होत असतात. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही चुरशीची होणार
प्रवीण माने काय भूमिका घेणार?
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे आगामी काळात कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. कदाचित ते समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे, तसे झाल्यास इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था ही तिरंगी होण्याची शक्यता आहे.





