Pune District : लाला अर्बन को ऑप बँक उत्कृष्ट

कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील लाला अर्बन को ऑप बँकेला 2023-2024 आर्थिक वर्षामध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री डॉ. पंकजी भोयर आणि सारस्वत को ऑप बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर यांचे हस्ते मुंबई येथे लाला बँकेला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक अॅड. निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, डॉ. मंगेश बाणखेले, नारायण गाढवे, जयसिंग थोरात, संदीप लेंडे, भानुदास टेंगले, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.
लोकनेते माजी खासदार स्व किसनरावजी बाणखेले यांनी 51 वर्षांपूर्वी बँकेची स्थापना केली. बँकेने 2023-2024 आर्थिक वर्षात ठेवींमध्ये 45 कोटींची तर कर्जामध्ये 46 कोटींची वाढ झाली आहे. बँकेचा सीआरएआर 14.06 टक्के असून नेट एनपीएचे प्रमाण शुन्य टक्के राखले आहे. ऑडिट वर्ग अ मिळविला आहे. आर्थिक गुणवत्तेच्या निकषावर पुरस्कार बँकेस जाहीर झाला आहे.
याच आर्थिक वर्षामध्ये बँकेची 14 वी नवीन ओतूर शाखा एटीएमसह कार्यान्वित झालेली असून पुढील काळात शेळपिंपळगाव येथे शाखा सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. बँकेच्या 524 कोटी ठेवी असून 349 कोटीचे कर्ज वाटप असा एकूण 873 कोटींचा मिश्र व्यावसाय आहे. बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सुस्थितीत व्यवस्थापन कॅटेगिरीमध्ये आहे. बँकेची मोबाइल बँकिंग सुविधा कार्यान्वित असून ग्राहकांना क्रेडिट रेटिंग दराने कर्जपुरवठा केला जात असल्याने असुन ग्राहकांना फायदा झाला असल्याचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी सांगितले.
पुरस्कारासाठी लाला बँकेची पुणे विभागामधून 500 कोटी पर्यंतच्या ठेवी असलेल्या बँकांमधून निवड करण्यात आली आहे.
– युवराज बाणखेले, अध्यक्ष, लाला बँक





