Pune District : जुन्नर नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव

खुल्या गटातील पुरुष इच्छुकांचा हिरमोड
जुन्नर – १६३ वर्षे जुन्या असलेल्या जुन्नर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला असे आरक्षण पडल्याने, खुल्या गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. जुन्नर नगरपालिकेची मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती, तर २०२२ मध्ये पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला.
सन २०१७ मध्ये जुन्नर नगरपालिकेचे आरक्षण खुल्या गटासाठी होते, ज्यात तत्कालीन एकसंघ शिवसेनेचे श्याम पांडे विजयी झाले होते. नगरसेवकांमध्ये शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस १, व आपला माणूस आपली आघाडीचे २ उमेदवार निवडून आले होते. पूर्वी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकसंघ शिवसेना यांची तुल्यबळ ताकद होती. मात्र, आता दोन्ही पक्षांत दोन गट पडल्याने त्यांची ताकद विभागली गेली आहे. तसेच, यावेळी भारतीय जनता पक्षही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची क्षमता बाळगून आहे.
जुन्नर शहरात जवळपास २५ टक्क्यांच्या आसपास इतर मागासवर्गीय समाजाची मते असल्याचा कयास आहे, ज्यात माळी समाजाची मतदार संख्या मोठी आहे. त्यामुळे या समाजातील उमेदवारांना गळाला लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतील असे चित्र आहे.
आतापर्यंत माळी समाजातील दत्तात्रय चौधरी, सुनील मेहेर, अनिल मेहेर, भारतीताई मेहेर, किशोरी होगे यांना, तर ओबीसी समाजातून नथूशेठ करडीले, पांडुरंग लगड, विकास खोपे, छायाताई रेणुकदास यांना नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी राखीव येईल या आशेवर असलेले शाम पांडे, अनिल रोकडे, धनराज खोत, विक्रम परदेशी, बाबा परदेशी, भाऊसाहेब कुंभार, अविनाश करडीले यांसारख्या पुरुष इच्छुकांचा ओबीसी महिला आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे.
जुन्नर शहरात माळी, सोनार, तेली, शिंपी, कुंभार या ओबीसी समाजाचे सुमारे ९ हजार इतके मतदान आहे. मुस्लिम समाजातील काही महिलांकडेही या प्रवर्गाचे दाखले तयार असल्याने त्यादेखील निवडणूक लढविण्यास तयार आहेत. ओबीसी प्रवर्गातील अनेक महिलांनी नगराध्यक्ष पदाकरिता आपली इच्छा व्यक्त केली असून, त्या निवडणूक लढविणारच असा निर्धार इच्छुक महिलांकडून व्यक्त होत आहे.





