पुणे जिल्हा : वाघोलीच्या जयशची विविध विक्रमांना गवसणी

130 देशांची राष्ट्रगीते तोंडपाठ ः राष्ट्रगीतातून नोंदवले 4 विक्रम
वाघोली – येथील ओझोन विला सोसायटीत राहणाऱ्या जयश टोलीया या चिमुकल्याला 130 देशांची राष्ट्रगीते त्या देशांच्या भाषेत तोंडपाठ आहेत. विविध देशांची राष्ट्रगीते गाऊन जयशने आशिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये आपले नाव कोरले आहे. त्याच्या नावावर 4 विक्रम नोंदवले गेले आहेत.
वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला हा छंद जडला होता. याची सुरुवात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहत असताना त्यात दोन्ही देशांचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर त्याला उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर तो सोशल मीडियाद्वारे विविध देशांची राष्ट्रगीते सर्च करू लागला आणि शिकू लागला. त्याच्या नोट्स काढून संगीत समजून घेत आणि त्यातील भाषिक बारकावे शिकून घेतले.
सध्या तो भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, रशिया, अमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस आदी देशांची राष्ट्रगीते त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये म्हणतो. या विक्रमवीर जयश टोलीया याची शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.





