Pune District : इंदापूरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन
इंदापूर – गेल्या 21 वर्षांपासून योग कार्यातील अविरतपणे चालू असणारी सेवा त्याची दखल घेऊन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने इंदापूरचे दत्तात्रय अनपट यांना दिलेला योगरत्न पुरस्कार हा इंदापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने 2025 करिता देश पातळीवरील योगरत्न पुरस्कार दत्तात्रेय अनपट यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान पंचायत समिती सभागृह इंदापूर येथे मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पतंजली परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश पाडुळे, लक्ष्मण रेडके, अंकुश ढुके, हरिदास सामसे, लहू गाढवे, सुधीर मखरे, वसंत जाधव यांच्यासह योग साधक उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, एका दुर्धर व्याधीतून बाहेर पडून समाजाच्या आरोग्यासाठी आपण काहीतरी करणे आवश्यक आहे. या भावनेतून त्यांनी हे कार्य चालू केले, यास दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय योग साधकांनी योग साधनेचा लाभ घेतात. निरोगी आयुष्या बरोबर आनंदी जीवन जगत आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योगभवनाचे कार्य लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले.





