Pune District : भोर-कापूरहोळ रस्त्यावर अपघातांच्या घटनांत वाढ

भाटघर : भोर-कापूरहोळ रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे बहुतांशी काम झाल्याने चारचाकी वाहने व दुचाकी वाहने सुसाट वेगाने वाहत आहेत. सुसाट वेगाने जात असताना वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात होत आहेत. अपघाताचे प्रमाण घटवण्यासाठी या रस्त्यावरील वर्दळीच्या व एसटी बस थांबा या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
या नवीन रस्त्याचे कापूरहोळपासून बुवासाहेबवाडीपर्यंत काही भाग वगळता काम पूर्ण झाले आहे. पूर्वी या रस्त्याची रुंदी अंदाजे १७ फूट एवढी होती. परंतु सद्यस्थितीला या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने रस्त्याची रुंदी पूर्वीपेक्षा दुप्पट झालेली आहे. पूर्वी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे होते. तसेच रस्ता अरुंद असल्याने वाहने मर्यादित वेगाने वाहत होती. परंतु सद्यस्थितीला रस्त्याची रुंदी वाढल्याने व रस्त्यावर खड्डे नसल्याने वाहने सुसाट वेगाने वाहत आहेत.
सदर रस्त्यावर निगडे, कासुर्डी आळंदे, इंगवली, संगमनेर, हारतळी, सांगवी, बुवासाहेब वाडी या ठिकाणी एसटी बस थांबा आहे. सदरच्या ठिकाणी मुख्य रस्त्याला खेडेगावातून येणारा रस्ता जोडलेला आहे. भोर-कापूरहोळ या मुख्य रस्त्यावरून वाहने वेगाने वाहत असल्याने खेडेगावातून मुख्य रस्त्यावर येताना अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. तर काही वेळा अपघातही होत आहेत. यासाठी एसटी बस थांबा ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.
सदर रस्त्यावर गेल्या सहा महिन्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरील अपघातात बहुतांश दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा संसार उघड्यावर पडत आहे. भविष्यात या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असून मुलांचे शिक्षण धोक्यात येत आहे. यासाठी अपघाताचे प्रमाण घटवणे गरजेचे आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक केल्यास वाहनांच्या वेगाला मर्यादा येईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल.
” गेल्या काही महिन्यांपासून भोर-कापूरहोळ रस्त्यावर वाहने सुसाट वेगाने वाहत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा हा वेग मर्यादित होण्यासाठी गावच्या ठिकाणी व एसटी बस थांबा या ठिकाणी तात्काळ थर्माप्लास्टिक गतिरोधक बसवावे, असा आदेश आम्ही संबंधित ठेकेदाराला दिला आहे. तसेच वाहनचालकांनीही वाहन चालवताना सावधगिरीने व मर्यादित वेगाने वाहने चालवावीत. ”
– योगेश मेटेकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर





