पुणे जिल्हा : डेंग्यूतापासाठी उपाययोजना राबवा ; मुख्याधिकारी रोकडे

बारामती : शहरात डेंग्यू आणि चिकणगुनिया आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नगर परिषदेच्या वतीने या आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
रोकडे म्हणाले की, नागरिकांनी आठवडयातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदातरी रिकामी करून घ्यावीत. ती घासून, पुसून कोरडी करुन वापरावी. पाण्याचे साठे (उदा. भांडी, ड्रम) यांना घट्ट झाकणांनी बंद करावेत. घरचा परिसर किंवा छतावरील निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. डासांपासून व्यक्तिगत सुरक्षितेसाठी मच्छरदाणीचा तसेच डास प्रतिबंधक क्रिम, लिक्वीड, मॅट अथवा कॉईलचा वापर करावा.
शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घालावेत. संध्याकाळी दारे व खिडक्या बंद ठेवावेत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. दीर्घकाळ घर बंद ठेवल्यास पाणीसाठे व्यवस्थित ठेवावेत, नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ताप व अंगदुखीसारखी लक्षणे आढळल्यास शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व महिला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली असून नागरिकांनी येथे उपचार घ्यावेत.
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जळोची, कसबा, आमराई आणि अग्निशमन केंद्र पाटस रोड येथे डेंग्यू व चिकुनगुनिया आजारपणासाठी लागणारी औषधे मोफत उपलब्ध करून दिली आहेत.





