Pune District : भाडेकरार नसल्यास घर मालकावर गुन्हा दाखल करणार

पौड : पौड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावातील नागरिकांना घर भाड्याने देताना विशेष काळजी घ्या, भाडेकरूंची सर्व माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या, जर भाडेकरू परराज्यातील तसेच गुन्हागार प्रवृत्तीचा आढळला तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पौड पोलिसांनी मुळशीतील घरमालकांना दिला आहे.
काही दिवसापूर्वी पौड येथील झालेल्या अन्नपूर्णा देवीची विटंबना एक मुस्लिम मुलाने केली होती. त्यामुळे पौड येथील वातावरण तणावपूर्ण होते यावेळी विटंबना करणारा मुलगा हा परप्रांतीय होता तो ज्या भाड्याच्या घरात राहत होता. त्याचे कोणतेही भाडेकरार केलेला नव्हता व मालकाने कोणतेही पुरावे पाहिले नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या घरमालकावर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पौड पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करण्याचे हाती घेतले आहे. यामध्ये घर मालकाकडे भाडे करार नसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत.
घर मालक भाडेकरू यांची माहिती न घेता काही जास्त भाडे मिळते म्हणून नागरिक आपले घर भाड्याने देत असतात अशावेळी कोणतेही कागदपत्रे ओळखीचा पुरावा आधार कार्डची पाहणी न करता आपल्या घरात राहायला जागा देतात आणि त्यांच्याकडून कोणताही प्रकारचे भाडेकरार करून घेत नाही तसेच याची माहिती स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच, पोलीस पाटील व पोलीस स्टेशनला कळवली जात नाही. यामुळे अनेक गुन्हेगार आपल्या परिसरात व घरात आश्रय घेत असतात. त्यामुळे याबाबत पोलिसांना माहिती कळवणे आवश्यक आहे.
जनजागती आवश्यक
स्थानिक पोलीस पाटील व सरपंच यांनी आपल्या गावातील भाडेकरू यांची माहिती गोळा करून ज्यांचे भाडेकरार नाही अशांची माहिती तसेच ज्या घरमालकांनी भाडेकरार केला आहे त्याची प्रत स्थानिक पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावांमधील घरमालक यांनी आपल्या घरात राहणार्या भाडेकरूंबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला भाडेकरार ची प्रत व त्यांची ओळखपत्र देऊन माहिती देणे आवश्यक आहे. भाडेकरार न करता कोणी आढळून आल्यास अथवा माहिती समजल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल कारण्यात येईल वाढीव भाडे मिळते म्हणून कोणालाही घर भाड्याने देऊ नका. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
-संतोष गिरीगोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पौड पोलीस स्टेशन





