Pune District : पतीने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या ; खुनाचा गुन्हा दाखल

वाघोली : आव्हाळवाडी येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मृत पतीवर वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय 42) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी उज्वला (वय 40) ही बाजूला बेडवर मृत अवस्थेत आढळून आली होती.
पोलिसांनी दोघांची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली होती; मात्र उज्वला यांचा शवविच्छेदन अहवाल, अंगावरील मारलेले घाव, लोखंडी हातोडा, चाकू व रक्ताने माखलेली ओढणी घटनास्थळी आढळून आल्याने नागनाथ यांनी पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मारहाण करून गळा आवळून त्यांनी पत्नीची हत्या केली.
यानंतर वाघोली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार यांनी फिर्याद दिली. वारुळे कुटुंबिय फळ विकण्याचा व्यवसाय करत होते. पुढील तपास वाघोली पोलिस करीत आहेत.





