पुणे जिल्हा : केंद्राकडून महाष्ट्राला दुजाभावाची वागणूक

सत्यशील शेरकरांच्या प्रचारार्थ जुन्नर येथे जयंत पाटलांची तोड धडाडली
जुन्नर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यानी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणूक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही, अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार (पवार गट) सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी उमेदवार सत्यशील शेरकर, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, अनंतराव चौगुले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, मोहन बांगर, मंगेश काकडे, बाजीराव ढोले, अंकुश आमले, मोहित ढमाले, सईद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकार हे महाराष्ट्राला दुजेपणाची वागणूक देत आहे. भाजप सरकारच्या काळात शेतक-यांवर नेहमीच अन्याय झाला आहे. ज्यांना आमदार केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले ते शरद पवार यांना सोडून गेले तरी पवार डगमगले नाहीत. देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे. जीएसटी वाढविल्याने जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे, महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे असेही त्यांनी नमूद केले.
पवारांच्या अशीर्वादाशिवाय निवडणूक…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नर तालुक्यात निवडणूक लढवता येत नाही. सद्यस्थितीत पवार यांचा आशीर्वाद सत्यशील शेतकर्यांच्या पाठीशी असल्याने जनताही त्यांनाच संधी देणार. आता खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर अशी जोडी शरद पवार यांनी दिली आहे, असे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी विरोधी उमेदवाराला टोला मारला.
विघ्नहर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेरकर परीवार हे तालुक्यात समाजसेवा करण्याचे काम करत असल्याने शेतक-यांशी नाळ जोडलेली आहेत. शेतकर्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे.तालुक्यात पाणीटंचाई, कांदा बाजारभाव यासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहे. दुष्काळी परिस्थित चारा व वाडीवस्तीवर पाण्याच्या पोहोचविण्याचे काम केले असून तालुक्याचा विकास केवळ शरद पवार यांच्यामुळेच झाला आहे.
– सत्यशील शेरकर, उमेदवार, महाविकास आघाडी
शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडणा-यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांनी गावोगावी सायकलवर जाऊन सभासद गोळा करून कारखाना उभारला आहे तसेच शिवसैनिक नेहमी आदेश पाळतो गद्दारी कधीच करत नाही. तो आदेश पाळणार आहे. भाजपाने अतीशय गलिच्छ राजकारण केले आहे. राज्य वाचवायचा असेल महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे.
– माऊली खंडागळे, अध्यक्ष, ठाकरे गट, जुन्नर तालुका





