पुणे जिल्हा : बारामतीत रंगणार आज अश्वप्रदर्शन

कृषी प्रदर्शनात ५० पेक्षा अधिक घोडे सहभागी होणार
बारामती – अश्वप्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमथडी जातीचा शो रविवारी (दि. २१) होणार आहे. त्यामध्ये 50 पेक्षा अधिक अश्वांचा सहभाग असणार आहे. हे प्रदर्शन सोमवार (दि. २२)पर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे , अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी दिली.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती फार्म येथे जागतिक दर्जाच्या कृषिक प्रदर्शऩाचा शनिवारी (दि. 20) तिसरा दिवस होता. पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रदर्शनाला पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांनीही भेट दिली. त्यांनी प्रक्षेत्रावर असलेले विविध तंत्रज्ञान जाणून घेतले.
तसेच, ट्रस्टचे विश्वस्त रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित डॉ. आप्पासाहेब पवार अश्वप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या अश्व प्रदर्शनामध्ये विविध राज्यातील १०० मारवारी जातीचे घोडे सहभागी झाले होते. यावेळी आचायांनी शेतकरी व विद्यार्थांशी संवाद साधला.
यावेळी कृषी प्रदर्शनामध्ये आता शेतकऱ्यांचा कल हा शेतीउपयोगी यंत्रसामुग्री, ट्रॅक्टरचलित अवजारे, आंतर मशागतीचे अवजारे, औषध फवारणी यंत्रे असतील किंवा इतर यंत्रांमध्ये शेतकरी माहिती घेताना दिसून आले.
दरम्यान, शनिवारी डॉग शोमध्ये तीन प्रजातीच्या श्वानांचा सहभाग होता. रितेश नांगरे यांच्या टॉय जातीच्या श्वानाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, इंडियन जातीमध्ये बारामतीमधील आदित्य जाधव आणि मीडियम जातीमध्ये किरण दळवी यांच्या श्वानाला प्रथम क्रमांक मिळाला. डॉग शोमधील विजेत्यांना राजेंद्र पवार यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.





