14 वर्षे मुलांची राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता निवड
ओझर – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय ओझरच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने विभागीय स्तरावर व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेकरिता दिमाखात प्रवेश मिळविला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर दांगट सर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित विभागीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पुरंदर हायस्कूल, सासवड येथे पार पडल्या. चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड या संघांचा पराभव करून फायनलमध्ये नगर ग्रामीण अशा मातब्बर संघांवर मात करून विघ्नहर विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांनी विजेतेपद पटकावले आणि राज्यपातळीवर दिमाखात प्रवेश मिळविला आहे.
या खेळाडूंमध्ये स्वराज जगदाळे, अथर्व कुटे, ओमकार टेंभेकर, संस्कार भोर, देवांग हांडे, वेदांत हांडे, अन्वय भागवत, सोहम वाळुंज, वेदांत ग. टेंभेकर, रवींद्र काकडे, सुजल मांडे, वेदांत सं. टेंभेकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक गणेश राऊत सर यांनी मार्गदर्शन केले आहे.
मार्गदर्शक आणि संघातील खेळाडूंचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे तसेच सर्व विश्वस्त, दोन्ही गावचे सरपंच राजश्री कवडे, तारामती कर्डक, सदस्य, समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.