पुणे जिल्हा । देहूत उच्चांकी मतदान, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहुगाव : मावळ विधानसभा मतदार संघातील देहू नगरपंचायत हद्दीत मतदान केंद्रावर एकूण ७०.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावले. यासह आजवर झालेल्या विधानसभा निवडणुकीतीही हे सर्वात उच्चांकी मतदान असल्याची माहिती मिळत आहे.
मावळ विधानसभा मतदार संघातील देहू येथे पुरुष, महिला आणि इतर असे एकूण २१ हजार ५५६ मतदार आहेत. त्यापैकी १५ हजार ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यासह मतदारसंघातील सहा उमेदवारांचे भवितव्य बुधवारी (दि.२०) मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे.
देहूत १६ आणि ४ माळवाडी असे दोन ठिकाणी एकुण २० केंद्र (बुथ) होते. सायंकाळी सात वाजता शेवटचे मतदान झाले. मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांची रांग होती. उमेदवारांचे प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदारांना मदत करण्यासाठी तळ ठोकून होते. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. मतदान केंद्राजवळ १०० मीटर पर्यंत पूर्णपणे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.





