पुणे जिल्हा : खेडच्या दक्षिण भागात मेंढपाळाचे कळप दाखल

भातपीक कापणीची बहुतेक कामे पूर्ण झाल्याने शेती चरण्यासाठी मोकळी
चिंबळी – खेड तालुक्या दक्षिण भागात दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही चार्याच्या शोधात मेंढपाळांचे कळप दाखल झाले आहेत.
तालुक्यात खरीप हंगामातील भातपीक कापणीची बहुतेक कामे झाली आहेत. त्यामुळे शेती चरण्यासाठी मोकळी झाली असल्याने मेंढपाळांचा फायदा होत आहे.
काही दिवसांच्या मुक्कामानंतर कळप दुसरीकडे मार्गस्थ होणार असल्याचे मेंढपाळांकडून सांगण्यात आले. चिंबळी, कुरुळी परिसरात नगर जिल्ह्यातील ढवळपुरी येथील मेंढापाळ दाखल झाले आहेत. दिवाळीनंतर या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा उपलब्ध असतो. चार्याच्या शोधात साधारण दसरा, दिवाळीनंतर कळप खेड तालुक्यात येतात.
आलेले कळप साधारण किमान सात महिने चार्याच्या शोधात भटकंती करतात. शेतकर्यांकडून चारा, पैसे किंवा धान्य घेऊन त्या मोबदल्यात रात्री शेतात मेढ्यांचा तळ बसवला जातो. यामुळे शेतीला सेंद्रिय खत मिळते. परिसरात सध्या भातपीक कापणीची 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती मोकळी झाली आहे. त्यामुळे रिकाम्या शेतीमध्ये मेंढ्यांचा तळ बसवला जातो.
शेत जमीन, माळरान क्षेत्रात घट
खेडच्या दक्षिण भागात गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली असल्याने शेत जमीन व माळरान क्षेत्रात घट झाली आहे. तसेच माळरान ठेवलेली नाहीत. शिवाय चरण्यासाठी रान मिळत नाही, तसेच काही वेळा अपुरा पाऊस आदी कारणांमुळे चाराटंचाई जाणवते. दरम्यान, पूर्वी सारखे या वर्षी हिरवेगार गवत मेंढपाळांना मिळत नसल्यामुळे चारा शोधण्यासाठी मेंढपाळ भटकंती करत असल्याचे मेंढपाळांनी सांगितले.





