पुणे जिल्हा : हर्षवर्धन पाटलांचा मुक्काम आता मुंबईला -शरद पवार

इंदापूरच्या इतिहासात विक्रमी गर्दीची सभा ः सत्ताधार्यांचा खरपूस समाचार
इंदापूर – महाराष्ट्रामध्ये शेती, शिक्षण व इतर ठिकाणी परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या सारख्या सहकार्यांची गरज आहे. उद्या महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांच्या हाती आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा मुक्काम इंदापूरला नाही तर मुंबईला राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नमूद केले. इथल्या आमदाराला मी सर्व काही दिले; मात्र गडी कुठे गेला हे कळलं नाही. ही कसली माणसे, यांच्या पाठीला कणा नाही. हा रुपया खोटा निघाल्याने त्यांना निवडणुकीत त्यांचा जागा दाखवा, असा नारा शरद पवारांनी दिला.
इंदापूर येथे वाघ पॅलेस शेजारील भव्य मैदानावर सोमवारी (दि. 18) महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. या सभेला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शरद पवार पुढे म्हणाले, इंदापूरचे चित्र बदलण्यासाठी स्व. शंकररावभाऊ पाटील त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना सरकारमध्ये काम करण्याचे संधी मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी काम केले. राज्यात लोकांना बदल परिवर्तन पाहिजे. या मागणीला तुम्ही साथ द्या व हर्षवर्धन पाटलांना तुम्ही निवडून द्या.
हर्षवर्धन हे वेगळ्या पक्षात होते मी वेगळ्या पक्षात होतो; मात्र महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेताना आम्ही दोघांनी कधीही राजकारण आणलं नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मी अध्यक्ष व समितीत हर्षवर्धन पाटील आहेत. आम्ही विविध प्रश्नांवर चर्चा करतो. जबाबदारी कोणावर टाकायची, असा प्रश्न पडतो त्यावेळेस दोन-तीन जणांचे नाव येते त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांची नाव अग्रभागी आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कोणतेही काम करण्याची दृष्टी आणि कुवत आहे.
हर्षवर्षन पाटील म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत चांगला विचार पोहोचेल असे नाव म्हणजे शरद पवार. राज्यात त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होतेय. आता नवीन फॅड आले आहे रडायचं, जाता जाता त्यांना आपण दहा वर्षात वाईट केलं याची जाणीव झाली असावी, त्यामुळे रडायला आले असावे. शरद पवारांचा विश्वास इंदापूरच्या जनतेवर आहे म्हणून मला पार्लमेंटरी बोर्डात घेतले. इंदापूर तालुका परिवर्तन करण्याच्या भूमिकेत आला आहे. ही सांगता सभा विरोधकांची राजकारणात सांगता करणारी. निवडणुकीनंतर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. आर्थिक बदल घडवायचा आहे. तालुक्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवणार असून, प्रत्येक वर्षाला काय करणार याचा मास्टर प्लॅन तयार करणार असून पुढच्या चार पिढ्यांचा शेतीचा प्रश्न सोडवल्याशिवाय हर्षवर्धन पाटील शांत बसणार नाही हा शब्द देतो. येत्या 23 तारखेला निकाल लागू द्या एक महिन्यात प्रशासन कसं सुधारायचा ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील स्विकारायला तयार आहे.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. इंदापूर तालुक्याच्या इतिहासातील विक्रमी सभा झाल्याची चर्चा सभेनंतर सुरु होती.
इंदापूर-बारामतीतील दडपशाही आपणास मोडून काढायची आहे. मला आजींनी शिकवले रडायचं नसतं तर लढायचं असतं, ते कॉन्टॅक्टरसाठी रडले असतील. चालू निवडणुक ही अस्मिता व स्वाभिमानाची लढाई आहे. शेतकर्यांना कर्जमाफी, दुधाला भाव मिळालाच पाहिजे यासाठी मी आग्रही राहणार आहे.
-सुप्रिया सुळे, खासदार बारामती
गुजरातच्या उद्योगपतीला फोन करून त्यांचं कल्याण केलं
इथल्या आमदाराने वाहतुकीच्या धंद्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे, मला मदत करा असे सांगितले, त्यावर मी फोन उचलून गुजरातच्या उद्योजकाला सांगितले व त्यांचं कल्याण झालं. तसेच निवडणुकीला उभे राहताना मदत केली. जिल्हा परिषदेला, विधानसभेमध्ये मदत केली, मंत्रिमंडळात घेतलं. इंदापूर बरोबरच महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तीचे जे जे लोक आहेत त्यांना बाजूला करा, असे आवाहनही शरद पवार यांनी भाषणात केले.
सभेला मार्केट कमिटीची जागा मुद्दाम दिली नाही
शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या आजच्या सभेला मार्केट कमिटीची जागा मुद्दाम देण्यात आली नाही. मी संबंधितांना तीन वेळा फोन केले, एकदा जाऊन भेटलो; मात्र सभेसाठी जाणून-बुजून जागा दिली नाही. या घटनेचा मी निषेध करतो असे भाषणात पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी सांगितले.





