Pune District : हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश चर्चेत

प्रवीण माने यांना पक्षांतर्गत स्पर्धा वाढणार ः समर्थकांमध्ये द्विधावस्था
पळसदेव – राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा माहोल तापू लागला आहे. पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असताना इंदापूर तालुक्यातही हे चित्र स्पष्ट दिसत आहे. नुकतेच माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तालुक्यात भाजपची ताकद वाढवली आहे. त्यातच आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे; मात्र या प्रवेशामुळे माने यांच्या राजकीय स्पर्धा निर्माण होणार, असा सूर राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.
2019 मध्ये भाजपची साथ स्वीकारून लढलेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा 19 हजार मतांनी पराभव झाला. दुसरीकडे, अपक्ष लढून 37 हजार मते मिळवणारे प्रवीण माने आता भाजपमध्ये असून, 2029 साली कमळाच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये परतले, तर पक्षात दोन संभाव्य दावेदारांच्या टोकदार स्पर्धेचे चित्र निर्माण होईल. पाटील यांना पुन्हा तिकीट मिळाले, तर माने यांची अवस्था काय होईल? हा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी पराभवानंतरही सहकार क्षेत्रातील अनुभव गाठीशी ठेवत फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळवली; मात्र भाजपला सोडून पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन विधानसभा लढवली आणि पराभूतही झाले. सध्या भाजपने दिलेल्या अध्यक्ष पदावरून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. ही खुर्ची वाचवण्यासाठीच पाटील यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
कार्यकर्ते गोंधळात, नेतृत्वात विसंवाद
भाजपमध्ये सध्या माने यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. अशातच पाटील यांचे पुनरागमन झाले, तर दोघांचे गट एकत्र येणे सहज शक्य नाही. नेतृत्वातील स्पर्धा आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमामुळे पक्षबांधणी ऐवजी अंतर्गत संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ शकते. राजकीय निरीक्षकांच्या मते, नेते स्वार्थासाठी कितीही वेळा पक्ष बदलू शकतात, पण कार्यकर्त्यांची मानसिकता आणि निष्ठा एका रात्रीत बदलत नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश हा माने यांच्या राजकारणासाठी अधिक खडतर ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.





