पुणे जिल्हा : काम करताना गट-तट पाहत नाही

कळस येथील प्रचार सभेत आमदार भरणेंचे प्रतिपादन
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील येणार्या माणसाचे काम, कसे मार्गी लागेल त्याला कशी मदत करता येईल. हा माझा स्वभाव आहे. कधीही काम करताना गट-तट पाहत नाही. मी कुणालाही कामासाठी उंबरे झिजवण्यास लावत नाही. जे काम होते ते करतो. जे होत नाही ते स्पष्ट सांगतो, असे प्रतिपादन इंदापूर विधानसभेचे महायुती (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
आमदार भरणे यांच्या प्रचारार्थ कळस (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि. 12) आयोजित केलेल्या प्रचार सभेत भरणे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वैशाली पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे,
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नेते शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे, युवक नेते सुरज वनसाळे, उद्योजक वसंतराव मोहोळकर, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक राहुल जाधव, भरतराजे भोसले यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतापराव पाटील म्हणाले की, विठ्ठल मंदिर म्हणून धाकटे पंढरपूर आमच्या कळस हद्दीत आहे. त्या मंदिराचा उतारा कळस गावचा आहे. या परिसरासाठी मामांनी 93 लाखाचा निधी दिला गेला; मात्र कुठेही गवगवा झाला नव्हता.परंतु कळस गावचे हे मंदिर आहे कळस गावाला याचा मान कायम राहिला पाहिजे. काही लबाडांना बाजूला काढायचे आहे.चुकीच्या माणसांवर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसने आंधळे प्रेम करू नये, अशा माणसांपासून सावध राहा, असे त्यांनी केले.





