Pune District: पुण्यात उद्या ग्राममर्मी सन्मान सोहळा

दौंड : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राममर्मी सन्मान सोहळ्यानिमित्त ग्रामसंवाद मेळावा आयोजित केला आहे. ग्रामगौरव मीडिया फाऊंडेशन, अ. भा. सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विशेष सहकार्याने तसेच इन्फनाइट मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या सौजन्याने गुरुवार (दि.३) रोजी दुपारी १ वाजता पुण्यात श्री गणेश कला क्रीडा सभागृहात उपक्रमाचे भव्य आयोजन केले आहे. दौंडचे आमदार ॲड. राहुलदादा कुल यांना ‘ग्राममर्मी : महाराष्ट्र भूषण आमदार’ आणि ग्रामीण भागाला अर्थसाक्षर करण्याचा ध्यास घेऊन कार्यरत असलेले इन्फनाइटचे चेअरमन नवनाथ आवताडे यांना ‘ग्राममर्मी : आर्थिक सल्लागार भूषण’ असे विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे हे जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व गावकारभाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ. एस. एस. मगर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, परभणीचे आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील, आमदार रोहित पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे,
भीमा पाटस कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव बारवकर, दौंड बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जामसिंग गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम, राज्य सचिव सुशील घरत, संगणक परिचारक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल घोळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान
गावांना समृद्धतेसाठी प्रोत्साहन देणाऱ्यांना ग्राममर्मी सन्मान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या जाहीर करणार आहेत. त्यांच्या हस्ते प्रत्येक तालुक्याला एक अशा 13 ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, महिला बचत गट, आदर्श 5 संगणक परिचालक, आदर्श 3 अंगणवाडी मदतनीस व सेविका, तीन आदर्श आशा सेविका, तीन फार्मर प्रोडयुसर कंपन्या अशा सर्वांना ‘ग्राममर्मी’ म्हणून आकर्षक सन्मानचिन्ह, भारताचे संविधान, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता, प्रत्येकाला वडाचे रोपटे देऊन पुरस्कार प्रदान होणार आहे, अशी माहिती ग्रामगौरवचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे, अ. भा. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, संयोजिका भाग्यश्री ठाकरे यांनी दिली.





