Pune District : शिरूर फ्लायओव्हरसाठी शासन सकारात्मक आमदार ज्ञानेश्वर कटके यांची माहिती

वाघोली : पुणे ते शिरूर होणाऱ्या अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च २०२५ मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे, अशी माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
आमदार कटके यांनी वाघोलीतील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईकने महामार्गाच्या कडेची अतिक्रमणे काढली. त्यानंतर कटके यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील प्रलंबित एलिव्हेटेड पुणे ते शिरूर अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी पाठपुराव्यास सुरूवात केली आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्याशी प्रकल्पाबाबत चर्चा केली. शिरूर-हवेली मतदारसंघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या ६० किमी लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधीत विभागांनेही सकारात्मकता दर्शविली आहे. प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ज्यावरून महामेट्रो, त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून चारचाकी वाहने, तळातील रस्त्यावरून अवजड वाहतूक व्यवस्था असणार आहे. हा उड्डाणपूल खराडीपासून ते शिरूर बायपासपर्यंत होणार आहे. खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला एक्झीट असणार आहे. तीन मजली उड्डाणपुलामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार असून कामाला प्रत्यक्षात मार्च २०२५ च्या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे.





