Pune District : ईदच्या मुहूर्तावर 18 लाखांच्या बोकडाची विक्री

वाघापूर : माळशिरस (ता. पुरंदर) येथील मेकॅनिकल इंजिनिअर झालेल्या उच्च शिक्षित ऋषिकेश दिलीप मोरे या तरुणाने करोना काळात गावी येत बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू करून त्यामध्ये भरारी घेतली आहे. शेळीपालन व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्याच विक्रीला बकरी ईदसाठी या शेतकर्याने माळशिरस येथे आपल्या शेडवरच 18 लाख रुपये किंमतीच्या बोकडाची विक्री केली आहे.
ऋषिकेश दिलीप मोरे याने 2020 मध्ये पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअर पूर्ण केले. त्यानंतर त्याला परदेशात दक्षिण आफ्रिकेत नोकरीची संधी मिळत होते. मात्र 2021मध्ये करोना आल्यावर तो गावी माळशिरस येथे आला. वडील दिलीप मोरे यांच्या सल्ल्याने गावाकडे बंदिस्त शेळीपालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण त्यानंतर त्यांनी घेतले. माळशिरस येथील आपल्या शेतावरती त्याने पाच गुंठे जागेमध्ये दीडशे बाय पंच्चेचाळीसचे बंदिस्त शेड तयार केले.
हे शेड तयार करताना शेळ्या जमीन स्तरावर राहणार नाही यासाठी जमीनीपासून आठ फूट उंचीवर फळ्याच्या साह्याने वरील कप्पा तयार केला. यामुळे शेळ्यांची विष्टा खाली जाऊन शेळ्यां खाली स्वच्छ व कोरडेपणा राहतो. शेळ्या, बोकड, करडे यांच्या स्वतंत्र संगोपनासाठी कप्पे तयार केले. ऋषिकेश मोरे यांनी शेळी पालनाची आवश्यक प्रशिक्षण घेतल्यानंतर राजस्थान येथे जाऊन जातिवंत सोजत व तोतापुरी या जातीच्या 40 हजार रुपयास एक याप्रमाणे 45 शेळ्या व त्यासाठी खास जातीवंत नर बोकड दीड लाख रुपये किमतीचा तिथून आणला. या जातिवंत नरापासूनच त्या ब्रीड पासून दोन वर्षांच्या काळात चांगल्या प्रकारची बोकडांची पैदास होऊन व्यवसाय वृद्धी मोठ्या प्रमाणात झाली.
शेडमधील शेळ्यांची संख्या वाढावी याकरता व्यवसाय सुरू केल्यानंतर अडीच वर्षांमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे शेळ्यांची व बोकडांची विक्री केली नाही. शनिवारी (दि. 7) त्यांच्याकडे 340 लहान मोठ्या शेळ्या व बोकडांची विक्री करूनही शिल्लक आहेत. दरम्यान, पुण्यातील कोंढवा परिसरातील खरेदीदारअस्साम शेख यांनीएक लाख 80 हजार रुपयाला खरेदी करून घेऊन गेले. पुढील वर्षासाठी त्यांच्या शेडमध्ये लहान मोठे दीडशे बोकड सध्या असून पुढील बकरी ईदला सव्वा कोटी रुपयांची विक्री होण्याची त्यांना अपेक्षा आहे.
चारा व्यवस्थापन
मोरे यांनी शेळी पालनाचा व्यवसाय करण्याचे निश्चित केलेनंतर आपल्या शेतातील शेडला लावूनच तीन एकरावरती विविध प्रकारचे शेळ्यांसाठीचा चारा लागवड केली.यामध्ये सुभाबळ,नेपियर, मका कडवळ, तुती ही चारापिके केली. त्याचप्रमाणे मुरघास तयार केला.
जागेवरच शेड वरती विक्री व्यवस्थापन
शेळीपालन सुरू केल्यानंतर मोरे यांनी मागील दोन वर्षांमध्ये शेडमध्ये तयार झालेले बोकड लगेच विक्री न करता त्यांची चांगल्या प्रकारे वाढ केली. यामुळे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये बोकडांची चांगल्या प्रकारे वाढ होऊन 70 किलो पासून ते 125 किलो वजनापर्यंत बोकडांचे वजन वाढली. यामुळे यंदा प्रथमच बकरी ईदला हे बोकड विकण्याचे नियोजन केले. 40 हजारापासून पावणे दोन लाखापर्यंत बोकडांची विक्री त्यांनी यावर्षी आपल्या शेडमधील 50 निवडक बोकडांची विक्री केली होती.





