पुणे जिल्हा : खेडमध्ये निष्ठावंतांलाच संधी द्या

शिवस्वराज्य यात्रेत सुधीर मुंगसेंची पक्षश्रेष्ठींकडे जाहीर मागणी
शेलपिंपळगाव : पक्षफुटीनंतर जे निष्ठेने पक्षासोबत राहिलेत अशा निष्ठावंत तरुण चेहर्यालाच विधानसभेची उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी खेड तालुक्यातील इच्छुक उमेदवार सुधीर मुंगसे यांनी शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी शिवस्वराज्य यात्रेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने किल्ले शिवनेरीहून शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेतील तिसरी सभा राजगुरूनगरमध्ये शुक्रवारी सायंकाळी उशिरा पार पडली. त्यावेळी मुंगसे बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, तालुकाध्यक्ष हिरामण सातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
किरण मुंगसे म्हणाले की, ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी मी आणि इतर सहकारी निष्ठा आणि प्रमाणिकपणे पक्षासोबत राहिलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना जी शिकवण दिली, त्याच आचरण आम्ही केले. लोकसभेच्या निकालानंतर अनेक जण पक्षात यायला इच्छुक आहेत. त्यांना निवडणूक देखील लढवायची आहे. पण जो निष्ठावंत आहे त्याला संधी द्यावी, अशी आपली मागणी आहे.
खेडमधील दडपशाहीला लोक वैतागल
खेड तालुक्यातील दडपशाहीला लोक वैतागले आहेत, त्रासले आहेत. त्यांना नवा चेहरा हवाय. तालुक्यातील शेतकर्यांचे, बिबट्यांचा प्रश्न आहे. एमआयडीसी असली तरी तरुणांच्या हाताला काम नाही, अशी परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी माझ्या सारख्या तरुण चेहर्याला संधी द्यावी, असे किरण मुंगसे म्हणाले.





