पुणे जिल्हा : पिकअपच्या धडकेत बालिका ठार

मुखईत घटना : दाम्पत्य जखमी
शिक्रापूर – शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पिकअपच्या धडकेने अपघात होण्याच्या घटना घडत असताना नुकतेच एका दाम्पत्याला पिकअपची धडक बसून झालेल्या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. यात प्राप्ती वैभव साबळे या चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव विजय साबळे व श्रद्धा वैभव साबळे, असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे.
मुखई येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व महाविद्यालयचे प्रा. वैभव साबळे हे त्यांच्या पत्नी व मुलीसह त्यांच्या दुचाकीहून पाबळ बाजूने शिक्रापूर बाजूकडे येत असताना शिक्रापूर बाजूने भरधाव वेगाने बैलगाडा शर्यतीची बैले घेऊन जाणारी पिकअपची साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
यावेळी साबळे, श्रद्धा साबळे तसेच त्यांची प्राप्ती हे तिघे जखमी झाले. पिकअप चालक पाबळच्या दिशेने पळून गेला. यावेळी नागरिकांनी जखमींना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारादरम्यान प्राप्ती वैभव साबळे (रा. साईपार्क सोसायटी शिक्रापूर) बालिकेचा मृत्यू झाला. प्रा. वैभव साबळे व श्रद्धा साबळे हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत विजय दादाभाऊ साबळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.





