Pune District : करंदीत गॅसचे स्फोट, आगीसह धुराचे लोळ

शिक्रापूर : करंदी (ता. शिरूर) येथे शिक्रापूर-चाकण रस्त्यावर असलेल्या भारत गॅस फाटा येथे मंगळवारी (दि. 29) दुपारच्या सुमारास एका टायरच्या दुकानाला लागल्याने आगीने शेजारील दुकानांना वेढा घातल्याने चार दुकाने जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
करंदी येथे शिक्रापूर-चाकण रस्त्यावर असलेल्या भारत गॅस फाटा येथे आज दुपारच्या सुमारास एका टायरच्या दुकानाला अचानक आग लागली. दरम्यान शेजारील नागरिकांनी दुकानातील काही टायर व दुचाकी बाहेर काढत आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र अचानक आग शेजारील गॅसच्या दुकानात गेल्याने गॅस सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. यावेळी सर्व नागरिक भयभीत झाल्याने बाजूला पाळणे आणि आगीने टायर दुकानासह शेजारील मोठे गॅरेज, चहाचे हॉटेल व एका गॅसच्या दुकानाला वेढले. यावेळी आगीचे भडके वाढत जाऊन धुराचे लोळ वाढू लागल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली.
काही वेळात चाकण नगरपरिषद, पुणे महानगर प्रादेशिक परिवहन तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतचे अग्निशामक दलाचे तीन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एक तास अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, माजी उपसरपंच पांडूरंग ढोकले, पिंपळे जगतापच्या पोलीस पाटील वर्षा थिटे, पोलीस शिपाई प्रताप कांबळे, सागर वर्पे, अविनाश तांबे, आपदा मित्र महेश साबळे पाटील, भाजपाचे उपाध्यक्ष अशोक शेळके, भरत ढोकले, माऊली ढोकले, सुदाम ढोकले, प्रदीप ढोकले यांनी विशेष परिश्रम घेत अग्निशामक दलाच्या जवानांना मदत करत आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले; मात्र या घटनेत टायर दुकानातील पन्नासहून अधिक टायर आदी साहित्य, प्रेमाचा चहा हॉटेलसह, गॅस सिलेंडरचे दुकान आणि एका गॅरेजचे पूर्णपणे नुकसान होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आग लागताच बाजूला घेतलेले टायर तसेच एक दुचाकी पूर्णपणे जाळून खाक झाली आहे.
बेकायदेशीर दुकानांना स्थानिकांचे अभय
करंदी येथे ज्या ठिकाणी आगीची घटना घडली ती दुकानांची जागा गायरान असून तेथे बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरचे दुकान सुरु होते; मात्र आता घडलेलल्या घटनेने या दुकानांना अभय कोणाचे, तसेच आता याला शासकीय मदत मिळणार का अशी चर्चा रंगली आहे.
या आगीमध्ये प्रथमदर्शनी मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. आगीच्या या घटनेबाबत आपण पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार आहोत.
-पांडुरंग नवले, तलाठी करंदी





