पुणे जिल्हा : धोका झाल्यास गॅस कंपनी जबाबदार

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): येथील ऐतिहासीक ब्रिटिशकालीन पुलाशेजारी सुरु असलेले गॅस एजन्सीचे काम हमीपत्रानंतर सुरु करताना सरपंच विक्रम गव्हाणे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, केशव फडतरे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे.
कोरेगाव भीमा – येथील भीमा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलास किंवा कोणत्याही स्थापत्यास गॅस एजन्सीमुळे धोका होणार नसल्याचे लेखी हमीपत्र गॅस एजन्सीने कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीला दिले आहे. सर्व सुरक्षा विषयक अटी, शर्ती पाळून काम करण्यात येणार असल्याने गॅस कंपनीचे एजीएम कल्पेश पोतदार यांनी सांगितले असल्याने गॅस लाइनच्या खोदकामास सुरुवात ग्रामपंचायतीने मंजुरी दिल्याचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथिल ऐतिहासीक पुलाशेजारुन एका गॅस एजन्सीच्या खोदकामामुळे पुलाला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे हमीपत्र दिल्यानंतरच परवानगी द्यावी अशी मागणी माजी सरपंच संदिप ढेरंगे व विजय गव्हाणे यांनी केली होती. यानंतर तर गॅस एजन्सीचे खोदकाम सरपंच विक्रम गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी काम बंद केले होते.
आज टोरेंटो गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एजीएम कल्पेश पोतदार यांनी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीस लेखी हमी पत्र देत नैसर्गिक वायू वाहिनी असल्याने या वाहिनीतून वाहनांसाठी सीएनजी व औद्योगिक वसाहती, हॉटेलसह घरांसाठी पीएनजी गॅस नेणार आहे. ही वायूवाहिनी सुरक्षित व देखभाल दुरुस्तीमुक्त असून भविष्यात कोणत्याही स्थापत्याला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी टोरेंटो गॅस कंपनीची असल्याचे हमी पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.
यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, शांताराम फडतरे, ग्रामसेवक रतन दवणे व कंपनीचे एजीएम कल्पेश पोतदार, रुपेश कुमार सिंग आदी उपस्थित होते.
“नागरिकांच्या सुचनांमुळे गॅस वाहिनीचे काम बंद करण्यात आले होते; मात्र गॅस कंपनीकडे जिल्हाधिकारी, जलसिंचन विभाग, पीएमआरडीए सह बांधकाम विभागाच्या सर्व परवानग्या असल्याने व शासनाने परवानग्या देताना नागरिकांच्या व वास्तुंच्या सुरक्षेची काळजी घेतली. ऐतिहासिक पुलासह कोणत्याही स्थापत्याच्या सुरक्षेबाबत लेखी हमीपत्र दिल्याने ग्रामपंचायतीने कामास मंजुरी दिली.” -विक्रम गव्हाणे, सरपंच कोरेगाव भीमा




