Pune District : वाघोली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’

वाघोली : प्राध्यापकाने साथीदारांच्या मदतीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारून त्यांना परिक्षेचे पेपर बेकायदेशीर मार्गाने पुन्हा रात्रीच्या वेळी लिहण्याची संधी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या युनीट सहाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मॅथेमॅटीक्स 2 या विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे 6 बंडल, 2 लाख 6 हजारांची रोकड, उत्तरपत्रिका ठेवलेली कंट्रोल रुमची चावी असे साहित्य जप्त केले आहे.
प्रा. प्रतिक किसन सातव (वय 37, रा. केसनंद वाघोली), आदित्य यशवंत खिलारे (वय 20, रा. वाघोली), अमोल आशोक नागरगोजे (वय 19, रा. वाघोली), अनिकेत शिवाजी रोडे (वय 20, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघोलीतील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेजचा प्राध्यापक प्रतीक सातव हा विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना मॅथेमॅटीक्स 2 चा पेपर रात्री कॉलेजमध्ये लिहण्यासाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास पथकाने कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात छापा टाकला.
त्यावेळी प्राध्यापक प्रतीक सातव हा साथीदारांच्या मदतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे इंजिनिअरींग मॅथेमॅटीक्स 2 या विषयाचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे 6 बंडल, रोकड, उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावीसह मिळून आला. तसेच कॉलेजमधे शिकणारे प्रथम वर्षाचे 8 विद्यार्थी मिळून आले. प्राध्यापक सातव व त्याचे साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग मॅथेमॅटीक्स 2 या विषयामध्ये नापास होण्याची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरुन ठेवले होते.
आर्थिक फायद्याकरिता संगनमत करून 10 ते 50 हजार रुपये स्वीकारले. कॉलेजमधील परीक्षा कंट्रोल रूमची बनावट चावी बनवून त्या चावीद्वारे उत्तरपत्रिकेचे सीलबंद बंडल काढून घेऊन विद्यार्थ्यांना त्यांची मूळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





