पुणे जिल्हा : चांदूस येथील गोळीबार; एकास अटक

मित्राला जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न
राजगुरूनगर – चांदूस (ता. खेड) येथे दि. 23 नोव्हेंबर रोजी शुभम संतोष तांबे (रा. आसखेड ता. खेड) वर गोळीबार झाल्याने त्याचे पोटात गोळी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या मित्राला खेड पोलिसांनी पिस्तुलासह अटक केले.
अंकुर रमेश कारले (रा. चांदूस, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चांदूस येथे दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री मित्राच्या बायकोच्या कारणावरून शुभमवर गोळीबार केला होता. तो पोटात गोळी लागून जखमी झालेला होता. खेड पोलिसांनी जखमी शुभमकडून घडलेल्या घटनेची माहिती घेत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी लागलीच दोन टिम तयार करून तपासाची चक्रे सुरू केली.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार घटनेतील आरोपी केतन श्यामराव कारले (रा. चांदुसफाटा, ता. खेड) यास तळेगाव येथुन अटक करण्यात आली होती. तर गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार अंकुर हा मुख्य आरोपी त्याचेकडील पिस्तुल या शस्त्रासह फरार झालेला होता. पोलिसांना खबर्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो चांदुस येथे येवुन लगेच जाणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली होती. पोलिसांनी साफळा लावुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाणे गुन्हे शोध (डी.बी) पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, सहायक फौजदार शंकर भवारी, पोलीस हवालदार संतोष मोरे, पोलीस नाईक प्रवीण गेंगजे, कॉस्टेबल योगेश भंडारे, स्वप्निल लोहार, सागर शिंगाडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक निरीक्षक बी. एन. काबुगडे हे करीत आहेत.





