-आंबेगाव तालुक्यात अनेक गावांत महिला सरपंचांचे पतीच सरपंच असल्याच्या तोऱ्यात मंचर – आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावात महिला सरपंच पद आरक्षण असल्याने जनतेतून लोकनियुक्त सरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु बहुतांशी गावामध्ये महिलां सरपंचाचे पतीच सरपंच असल्याच्या तोऱ्यात मिरवताना दिसत आहे. महिला सरपंच पतींची ग्रामपंचायत कारभारामध्ये लुडबुड वाढल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बहुतांशी पतीराज ग्रामपंचायत कर्मचारी,सदस्य व विरोधकांना विचारात न घेता आपली मनमर्जी चालवताना दिसून येत आहे.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून काही ग्रामपंचायतीमध्ये अविश्वास ठराव दाखल करण्याच्या प्रयत्नात सत्ता गट व विरोधकातील सदस्य तयारीत असल्याचे दिसून येत आहे. महिला सरपंचांचे पती ग्रामपंचायत कारभारामध्ये लक्ष घालत असल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. काही महिला सरपंचांचे पती, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता ग्रामसेवकांशी संगनमत करून परस्पर ग्रामपंचायत मध्ये होणारी कामे मार्गी लावताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांमध्ये महिला सरपंच व त्यांच्या पती विरोधात नाराजीचा सूर दिसून येत असल्याच्या तक्रारी स्थानिक आमदारांपर्यंत जावू लागल्या आहेत. काही गावांमध्ये ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडून हमरीतुमरी होवून वाद होताना दिसून येत आहे. काही गावांमध्ये महिला सरपंचांचे पतीच ग्रामपंचायत माध्यमातून होणारी कामे स्वतः ठेकेदारामार्फत करून घेत आहे. बहुतांश ठिकाणी महिला सरपंच ह्या फक्त कागदोपत्री सही करत असून त्यांच्या पदाचा कारभार हे त्यांचे पतीराजच पाहताना दिसून येत आहे. पतिराजांच्या सल्ल्यानुसार सल्ला पती राजांच्या सल्ल्यानुसार काही महिला सरपंच ग्रामपंचायतीचे काम करत आहे.महिला आरक्षण शासनाने दिले असले तरी शासनाचा उद्देश पती राजांच्या ग्रामपंचायत हस्तक्षेपामुळे सफल झालेला दिसत नाही. काही ठिकाणी महिला सरपंच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याना जुमानत नसल्याने डोकेदुखी होऊन बसल्याने गावाच्या विकास कामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.