पुणे जिल्हा : चणे-शेंगदाणे विक्रेत्यांचा मुलगा फौजदार

जेजुरीत भंडार्याची उधळण करीत फटक्यांची आतषबाजी
जेजुरी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातगाडीवर चणे-शेंगदाणे विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार्या विमल बाळासाहेब जावरें या दाम्पत्याचा मुलगा जनक बाळासाहेब जावरेम (वय 28) याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2022 मधील अराजपत्रित गट ब परीक्षेतून यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चणे शेंगदाणे विक्रेत्यांचा मुलगा फौजदार झाला अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर (मेकॅनिकल इंजिनिअर) असलेल्या जनक याने कुठेही क्लास न लावता रयत प्रबोधिनीचे उमेश कुदळे यांचे मार्गदर्शन घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सासवड येथील ग्रंथालयातील पुस्तकांचा अभ्यास केला आणि यश संपादन केले.
पुढील काळातही प्रशिक्षण पूर्ण करताना राज्य लोकसेवा आयोगाची (डी.वाय.एस.पी.) तयारी करणार असल्याचे जनक जावरे याने सांगितले. दरम्यान जनक याने परीक्षेत यश संपादन केल्याने शहरातील विविध संघटना व त्याच्या मित्र परिवाराने भंडार्याची उधळण करीत फटक्यांची आतषबाजी केली.
पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, रमेश लेंडे ,हेमंत सोनवणे, आदींनी त्याची भेट घेत अभिनंदन केले.





